जागेतील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याकडे ग्रामपंचायतीचा कानाडोळा, कारवाईची मागणी
चिपळूण : तालुक्यातील धामणवणे मिटलेवाडी येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याबाबत गटविकास अधिकारी चिपळूण यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना सात वेळा आदेश दिला होता. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यात यावे, सरपंच यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कमिटी यांच्यावर कारवाई करावी, यासाठी तक्रारदार सौ. राणी मालसिंग कुंभार व मालसिंग कुंभार यांनी पुन्हा एकदा चौथ्यांदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आपल्या मागणीची दखल न घेतल्यास कुंभार कुटुंबीय दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण छेडणार आहे. तालुक्यातील धामणवणे पिटलेवाडी येथील
जागेतील अतिक्रमण हटवण्याबाबत सौ. राणी मालसिंग कुंभार व मुखत्यार मालसिंग नानबा कुंभार यांनी आतापर्यंत तीनवेळा उपोषण केले होते. या उपोषणासंदर्भात गटविकास अधिकारी चिपळूण यांनी पाठवलेल्या पत्रानुसार सरपंच व ग्रामसेवक यांना हे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते. मात्र ते हटवले गेले नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेत या ४ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे धामणवणे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक सदस्यांच्या अपात्र करण्याबाबत सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र या सुनावणीत
गटविकास अधिकारी यांच्या पत्रावर योग्य तो खुलासा झाला नसल्याचे राणी मालरिंग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावेळी तक्रारदाराचे कोणते म्हणणं ऐकून न घेता आपण जागेची मोजणी करून घ्या आणि मग ठरवा असे सांगण्यात आले. मात्र याची मोजणी मूळ मालकाने १९९६ सालीच केलेली आहे. त्याला आजपर्यंत कोणीच आव्हान दिलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नेमकं का कारवाई करत नाहीत. हा सुद्धा प्रश्न पुढे येत आहे. त्यामुळे आता तक्रारदार कुंभार कुटुंबियाने चौथ्यांदा जिल्हा परिषद रत्नागिरी येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.