आमदार शेखर निकम यांनी केली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी
चिपळूण : कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चिपळूण बसस्थानकाच्या नव्या हायटेक इमारतीच्या कामाला ८ वर्ष उलटली तरी प्रकल्पाचा पाया तयार झालेला नाही. तेव्हापासून बसस्थानकाचा कारभार एका पत्र्याच्या शेडखाली चालविला जात आहे. प्रवाशांना-विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठी जागा नाही, आवारात इतर सोयीसुविधा नाहीत. यामुळे एस. टी. च्या वाहन चालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संताप व्यक्त केला जात असून या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पूर्णत्वासाठी वाढीव निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मुंबईत प्रत्यक्ष भेटीत केली आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे परिवहन मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे.
या निवेदनानुसार चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक इमारत नूतनीकरणाच्या कामाची महारानिविदा प्रक्रिया सन २०१६ मध्ये निघाली होती. सदर काम एका कंपनीला मिळाले होते. त्यांनी ते सन २०१९ पर्यंत होते. इमारतीच्या पायाचे अर्धे काम करुन काम परवडत नाही म्हणून अर्धवट स्थितीमध्ये सोडून दिले. त्यानंतर महामंडळाने सदर कामाचा ठेका संबंधित कंपनीकडून काढून घेतला.
तद्नंतर नवीन निविदा चिपळूण बसस्थानकाची पुनर्बाधणी करणे या नावाने दि. ०८ डिसेंबर २०२० या वर्षात ३ तीन कोटी ७० लाख रुपयाची संकेत स्थळावर जाहीर केली. परंतु सदर कालावधीमध्ये कोरोना महामारीमुळे व महामंडळाकडे निधी उपलब्ध नसल्याने सदर निविदा मंजूरीसाठी २० महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर माहे जुलै मध्ये या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. परंतु अद्यापही चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक इमारतीचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. तरी या विषयाकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
चिपळूण बस स्थानकाच्या हायटेक इमारतीच्या पूर्णत्वासाठी वाढीव निधी मिळावा
