चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गांवर बहादूरशेख नाका येथे भरधाव आयशर टेम्पोने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८.४५ वा.च्या दरम्यानं घडली. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.
रात्री बहादूरशेख नाका येथे रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोने चिपळूण कराड रोडने बाजारपेठेकडे जाणाऱ्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार विनोद नामदेव राठोड (२८, दिग्रस, यवतमाळ) हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मोटार सायकलच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघात झाला तेव्हा बाजूलाच हवालदार गणेश नाले व ए. एस. आय लिंगायत उपस्थित होते. त्यांनी मोटारसायकल स्वाराला ताबडतोब रुग्णवाहिकेने कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलवले. टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठविले. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरु केली.
अपघाताचे वृत्त समजताच पोलीस उपनिरीक्षक विकास निकम, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले व मदत कार्य सुरु केले. अपघातातील मोटारसायकल ही, यवतमाळ पासिंग असून ती सचित नामदेव राठोड याच्या मालकीची असल्याचे समजते. तर टेम्पो रत्नागिरी पासिंग असून तो साहिल आंबोळकर याच्या नावावर असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बहादूरशेख नाक्यात हायवेचे काम सुरु आहे. येथे बॅरिकेट्स लावण्यात आली असून रत्नागिरीकडून येणारी गाडी रस्ता ओलांडणाऱ्या चालकाला दिसत नाही. त्यामुळेच येथे अनेक अपघात होत असतात तरी येथील बॅरिकेटसची उंची कमी करावी, अशी मागणी होत आहे.
चिपळुणातील आयशर टेम्पोच्या धडकेत यवतमाळच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
