संगमेश्वर : पाणीपट्टी भरलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी बंद केल्यामुळे तुरळ गावचे सरपंच सहदेव सुवरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी या मागणीसाठी तुरळ येथील ग्रामस्थानी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ग्रामस्थ आंदोलन करणार असे समजतात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मौजे तुरळ निर्मल तंटामुक्त गृपग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील हरेकरवाडी या महसूल गावात ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजने प्रमाणेच अन्य चार स्वतंत्र खाजगी योजना गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. ग्रामस्थानी पाणीपट्टी भरलेली असतानाही सरपंच सहदेव सुवरे यांनी जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचा ही पाणीपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याचा प्रकार झाल्यानंतर ग्रामस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी याना पत्र देत हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते.. त्यानंतर तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला .याबाबत सरपंच सहदेव सुवरे यांचेवर पदाचा गैरवापर केल्याने अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी मुख्यकार्यकारि अधिकारी यांना पत्र देण्यात आले. त्यानुसार कार्यवाही न झालेने आज (बुधवार) या ग्रामस्थानी ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी नंदकुमार फडकले , विजय बामणे, संदीप येलोंडे ,मंजिरी फडकले ,शमिका बामणे यांच्यासह ग्रामस्थानी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
यावेळी आपली बाजू मांडताना आंदोलनकर्त्यांनी सरपंच सुवरे यांनी पाणीपट्टी भरलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता राजकीय सूडबुद्धीने आमचे व शाळेचे पाणी बंद केल्याचे सांगितले. तसेच लाभार्थ्यांना विश्वासात न घेता दूषित पाण्यासह आर्थिक दृष्ट्या न परवडणाऱ्या लादण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन कॅग्या पाणी योजनेबाबत आपण वरिष्ठ स्तरावर तक्रार केल्याने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचे नंदकुमार फडकले यांनी सांगितले.
वीज बिले आणि पाणीपट्टी बिले थकीत असल्याने योजना चालविणे कठीण
सरपंच सहदेव सुवरे यांच्याशी सम्पर्क साधला असता ही योजना चालवणे ग्रामपंचायतीला परवडणारे नसून वीज बिले आणि पाणी पट्टी थकीत असल्याने आपण हे पाणी बंद केल्याचे सांगितले मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतर आपण तात्काळ पाणी सुरू केल्याचे सांगितले.