संदीप घाग / चिपळूण
मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथे कोंबडया वाहतूक करणारा टेम्पो कलंडल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.15 च्या सुमारास घडली. यात सुदैवाने टेम्पोतील चालकासह क्लिनर थोडक्यात बचावले असून या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक केंडी निर्माण झाली होती.
दापोली येथील हा टेम्पो कराड येथे केंबडया आणण्यासाठी जात होता. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून पुढे वालोपे येथे हा टेम्पो आला असता या टेम्पोचे चाक दुभाजकाला घासले. यातूनच टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटताच हा टेम्पो महामार्गावर उलटला. सुदैवाने टेम्पोतील चालकासह क्लिनर थोडक्यात बचावले. या घटनेमुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले. क्रेनच्या सहाय्याने हा टेम्पो महामार्गावरुन बाजूला नेण्यात आला.
चिपळुणात कोंबडया वाहतूक करणारा टेम्पो कलंडला, चालकासह क्लिनर थोडक्यात बचावले
