सह्याद्री पुरस्कारासाठी गोवळकोटच्या राजे प्रतिष्ठानची निवड
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त दि. १६ व १७ जानेवारी २०२५ या कालावधीत सावर्डे येथील ‘स्मृतिगंध’ स्मारकस्थळी जयंती महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार’ गोवळकोट येथील राजे सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.
जयंती महोत्सव सोहळ्याला १६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सुरुवात होणार आहे. गोवळकोट येथील राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करून त्यांचा आदर्श समाजामध्ये रुजवण्याचे कार्य सुरू आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन व त्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रतिष्ठानचे सुरू असलेले कार्य हे महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक बांधिलकीचे भान जपून या प्रतिष्ठानने अनेक संकटसमयी समाजाला सहकार्य केले आहे. राजे प्रतिष्ठानच्या या कार्याची दखल घेऊन सन २०२५ चा ‘शिक्षण महर्षी स्व. गोविंदरावजी निकम सह्याद्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
पद्मश्री व नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, प्रसिद्ध उद्योजक मंदार भारदे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत राजे प्रतिष्ठानला हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
या ९० व्या जयंती सोहळ्याला व त्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव महेश महाडिक व सोहळा समिती आयोजकांकडून करण्यात आले आहे.