रत्नागिरी : गेल्या तीन दिवसांपूर्वी कुवारबाव येथे लोकवस्तीत दिसून आलेल्या गावांचे दर्शन शहरापासून जवळच असलेल्या खेडशी डफळचोळवाडीतही झाले. त्या ठिकाणी गवा रेडा रस्ता ओलांडून जात असताना नागरिकांनी खबरदारी घेतली.
कुवारबाव परिसरात रेल्वेस्थानक फाटा येथे मुख्य रस्त्यावर पहाटेच्या सुमारास जंगलातून भरकटलेला गवा नागरिकांना दिसला होता. अचानक रस्त्यात आलेल्या गव्याचे दर्शनाने त्यावेळी वाहनधारकांचीही पाचावर धारण झाली होती. एक वाहनधारक त्या गव्याला पाहून घसरलाही होता. पण त्या दिवशी लोकवस्तीतून निघून गेलेला गवा दोन दिवस तरी कुणाच्या नजरेत पडला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जवळच्या खेडशी डफळचोळवाडी परिसरात गवा शेतमळयात वावरताना दिसला. त्याला पाहून ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेतली. रस्ता ओलांडून तो त्या परिसरातून जात असताना दूरवरून त्याला पाहणारे ग्रामस्थही अचंबित झाले होते. थोडया वेळाने तो परिसरातील जंगलाच्या दिशेने मार्गस्थ झाला.