चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील माधव सभागृहात रविवार दि. १२ जानेवारी रोजी रत्नसिंधू सायकल संमेलन पार पडले. जिल्हा संमेलनाचे हे सलग चौथे वर्ष होते. यापूर्वी रत्नागिरी, खेड, दापोली इथे जिल्हा सायकल संमेलन पार पडले आणि यंदाचे यजमान पद चिपळूण सायकलिंग वलबकडे होते.
रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, खेड सायकलिंग क्लब, दापोली सायकलिंग क्लब, सिंधुदूर्ग, कनक रायडर्स क्लब सोबतच डोंबिवली, महाड, सांगली, सातारा, कराड, विटा, उंब्रज व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १५० सायकलप्रेमींची मांदियाळी या निमित्ताने झाली होती. उपस्थित सायकल प्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साही सहभागामुळे संमेलन यशस्वी पार पडले. चिपळूणमधील मल्हार नृत्य अकॅडमीच्या संचालिका स्कंधा चितळे आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्याद्वारे ईशवंदना सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. संमेलनाचे उद्घाटन आ. शेखर निकम यांच्या हस्ते अनिरुद्ध निकम आणि जिल्ह्यातील सायकलिंग क्लबच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पुजन करून संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचा शुभारंभ झाला.
चिपळूण सायकलिंग क्लबच्या ज्योती परांजपे लिखित मंतरलेले १४ दिवस या त्यांच्या पुणे ते अयोध्या सायकल प्रवासावर आधारित पुस्तकाचे त्यांचे सहप्रवासी डॉ. अश्विनी गणपत्ये व रमा करमरकर यांच्या उपस्थितीत, शेखर सरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे जनक म्हणून ओळखले जाणारे विनायक वैद्य यांनी उद्घाटन समारंभामध्ये मार्गदर्शन केले तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सायकल संमेलन ही संकल्पना प्रथम राबवण्याचा मान ज्यांच्याकडे जातो ते डोंबिवली सायकलिंग क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये दोन दिवस सायकल संमेलन राबवण्याची संकल्पना मांडत एक दिवस कोकणातील निसर्गरम्य पर्यटन सायकल राईड सर्वांसाठी एक दिवस आधी राबविण्याची कल्पना मांडली. चिपळूण सायकलिंग क्लबच्या प्रत्येक उपक्रमाला खंबीर पाठिंबा आणि मजबूत आधार देणारे आमदार शेखर निकम सरांनी उपस्थित सायकलप्रेमीं सोबत मनमोकळ्या गप्पा मारत स्वतःचे सायकलिंग अनुभव आणि सोबतच पर्यावरण जागृतीसाठी सायकलिंगचे महत्व यावर भाष्य करत ॲग्रो टुरिझम आणि सायकल पर्यटन यांची संयुक्त स्वागतार्ह कल्पना मांडली.
उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या संमेलनामध्ये अमॅच्युअर सायकलिस्ट ते अल्ट्रा सायकलिस्ट हा पुण्याच्या किरीट कोकजे यांनी त्यांच्या प्रेझेंटेशन मधून सांगितलेला, श्वास रोखून धरणारा प्रवास प्रेक्षकांना निःशब्द करून गेला. तसेच चॅलेंजिंग लडाख या सत्राद्वारे, सायकलने लेह ते मनाली प्रवासाची ग्रिनिज रेकॉर्ड होल्डर, कॉम्पिटीटीव्ह आणि अल्ट्रा सायकलिस्ट नेहा टिकम व मनाली ते लेह सायकल प्रवास केलेली नेहा भावसार या द्वयींची प्रकट मुलाखत प्रेरणादायी ठरली. दुपारच्या सत्रामध्ये आहारतज्ञ आणि अल्ट्रा सायकलिस्ट मेनेके न्युट्रीशनच्या संचालिका प्रिती गुप्ता, वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ व कॉम्पिटीटीव्ह, अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. आदित्य पोंक्षे, तसेच स्ट्रेन्थ ट्रेनर कॉम्पिटीटीव्ह,अल्ट्रा सायकलिस्ट सिद्धार्थ गाडेकर यांच्यातील न्युट्रीशन, हायड्रेशन, हार्टरेट मॉनिटरींग आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग व रेस प्रिपरेशन यावर आयोजित परिसंवादातून सर्व सायकलिस्टना अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. जिल्हा संमेलनामध्ये यंदाचा प्रतिष्ठेचा सायकल गौरव पुरस्कार रत्नागिरी सायकलिंग वलबचे सायकलिस्ट अमित कवितके यांना त्यांच्या सायकलिंग मधल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला तर विशेष गौरव पुरस्काराने दापोली सायकलिंग क्लबचे अंबरिश गुरव तर चिपळूण सायकलिंग क्लबचे अहमदअली शेख व डॉ. मनीषा वाघमारे यांना गौरवण्यात आले.
तसेच दीर्घकाळापासून आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी सायकलला वाहतुकीचे साधन म्हणून उपयोग करणाऱ्या चिपळूण परिसरातील दहा ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर मागील वर्षभरात संपूर्ण जिल्ह्यातील विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या सायकलिस्टना गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले तर मागील वर्षभरात जिल्ह्यातील सर्वात जास्त अंतराचे सायकलिंग करणाऱ्या मेल रायडर प्रशांत दाभोळकर यांना सायकल सम्राट तर फीमेल रायडर डॉ. मनीषा वाघमारे यांना सायकल सम्राज्ञी या पुरस्काराने गौरविण्यात आले. एकूणच उपस्थित सर्व सायकलप्रेमींनी, सायकलिंग संदर्भात अतिशय उपयुक्त माहीती मिळाल्याचे समाधान व्यक्त करत हे संमेलन अतिशय उर्जादायी आणि प्रेरणादायी ठरल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या सायकल संमेलनाद्वारे सायकल चळवळीला एक नवा आयाम मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
सदर संमेलनासाठी राधा गोविंद फाऊंडेशन सावर्डे, डॉ. प्रशांत पटवर्धन, विशाल पवार, जमाल खान, अखिल फैय्याज, प्रिती गुप्ता यांनी देणगी दिल्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबने ऋण व्यक्त केले. तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सायकलप्रेमींनी उत्स्फुर्त सहभाग दर्शविल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानले. या जिल्हा सायकल संमेलनाच्या यशस्वितेमध्ये चिपळूण सायकलिंग क्लबच्या प्रत्येक सहभागी सदस्याचा मोलाचा वाटा असल्याचे क्लबच्या संचालक मंडळाने भावना व्यक्त केल्या.