रत्नागिरी:-येथील स्वरा साखळकर आणि विकास साखळकर या कन्या आणि पित्याचा पुण्यातील एका समारंभात एकच वेळी सन्मान झाला.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील विसावा सोशल फाउंडेशन आणि हिरकणी महिला विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी रोजी पुण्याच्या पत्रकार भवनात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला.त्यामध्ये हा सन्मान झाला.
गेली १७ वर्षे रक्तदान हाच छंद मानून दर तीन महिन्यांनी स्वतः रक्तदान करणारे आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत रक्तदानाचे कार्ड उपलब्ध करून देणे, रक्त उपलब्ध नसल्यास रक्तदाता उपलब्ध करून देणे ही विकास साखळकर यांची नित्यनेमाची कामे झाली आहेत. त्यांनी स्वतः ४९ वेळा रक्तदान केले आहे. त्यापैकी तातडीची आवश्यकता असताना त्यांनी ३७ वेळा रक्तदान केले. त्यात २९ गर्भवती मातांचा समावेश आहे. कोविड काळात त्यांनी दोन रक्तदान शिबिरे घेतली. पहिल्या शिबिरात त्यांनी स्वतः चालक असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाला आपल्या चालक बांधवांमार्फत ४० बाटल्या रक्त उपलब्ध करून दिले, तर दुसऱ्या वेळी आपल्या मित्र परिवारांमार्फत २३ रक्त बाटल्या उपलब्ध करून दिल्या. यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी विकास साखळकर यांच्या या कामाची दखल घेतलेली आहे. आजपर्यंत त्यांना आदर्श रक्तदाता २०२१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२२, आदर्श समाज रत्न पुरस्कार २०२३, विक्रमी रक्तदाता २०२४, समाजभूषण पुरस्कार २०२४ असे पुरस्कार मिळाले आहेत.
श्री. साखळकर यांची कन्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णकन्या म्हणून प्रसिद्ध असलेली स्वरा विकास साखळकर हिचाही या कार्यक्रमात क्रीडा प्रकारातील भरीव कामगिरीमुळे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दामले विद्यालयात सहावीत शिकत असलेल्या स्वराने राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. तिच्या या यशाची हिरकणी महिला विकास संस्थेने दखल घेत हा पुरस्कार तिला दिला. तायक्वांदोमध्ये तिने आजपर्यंत २४ सुवर्णपदके १६ रौप्यपदके तर, १२ कास्यपदके अशी एकूण ५२ पदके पटकावली. नुकत्याच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन सुवर्ण पदके मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. यापूर्वी स्वराला युथ आयडॉल या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
पुणे येथे झालेल्या कालच्या कार्यक्रमात विकास साखळकर आणि स्वरा यांना लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेता ध्रुव दातार, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती ताई देसाई, हिरकणी महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शर्मिलाताई नलावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.