रत्नागिरी : रत्नागिरीतील एका शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोप दिल्याची घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. यानंतर संतप्त नागरिकांनी या शिक्षकाची वरात पोलीस ठाण्यात नेली. याप्रकरणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिक्षकाविरुद्ध विनयभंग व बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) नुसार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथमेश नवेले असे या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाला अटक करण्यात आली होती. मंगळवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 3 दिवसांची पोलीस काठडी सुनावण्यात आली.
नवेले हा शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत होता. 9 जानेवारी रोजी त्याने शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीला मिठी मारली होती. तसेच तिच्याशी अश्लिल संभाषण केले. या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने सर्व हकिगत पालकांना सांगितली.
या प्रकाराची शाळा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत शाळेचे संस्था चालक देखील घटनास्थळी दाखल झाले. शाळेत असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे सांगत त्या शिक्षकाचे तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
3 दिवसांची पोलीस कोठडी
विद्यार्थिनीशी विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रथमेश नवेले या शिक्षकाला अटक करण्यात आली होती. मंगळवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्याला 3 दिवसांची पोलीस काठडी सुनावण्यात आली. शाळेतील शिक्षकांचे निरनिराळे प्रताप समोर येत आहे.आता पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे