सचिन गुंड्येच्या माणुसकीचे असेही दर्शन
दोन वर्षात 8500 जणांना दिले जेवण
लांजा : आजकाल माणुसकी हरपल्याची उदाहरणे आपल्याला जागोजागी दिसून येतात. मात्र, तालुक्यातील वेरळचे सुपुत्र सचिन गुंड्ये यांनी सदिच्छा फाउंडेशनच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील गोरगरीब रुग्ण आणि नातेवाइकांना दोन वर्षांत ८५०० मोफत टिफीन पुरवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
सचिन गुंड्ये हे व्यवसायानिमित्त मुंबईत राहतात. व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकदा केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील आणि गावाकडील गोरगरीब जनतेची जेवणा -खाण्यापासून होणारी हेळसांड त्यांनी पाहिली. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रुग्ण आणि नातेवाइकांना स्वखचनि मोफत टिफिन पुरवण्यास सुरुवात केली. कामधंदा, व्यवसाय सांभाळून या सर्व गोष्टी करणे सहज सोपे नव्हते. म्हणूनच त्यांनी ‘सदिच्छा फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हळूहळू कामाचा व्याप वाढवला. सचिन गुंड्ये आणि सहकाऱ्यांच्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुरू असलेले काम लक्षात घेऊन आजवर अनेकजण आर्थिक मदतीसाठी पुढे येतात. दोन वर्षांत या संस्थेने आजवर ८५०० हून अधिक रुग्ण व नातेवाईकांना मोफत डबा पुरवण्याचे काम केले आहे.
या कामातून मिळणारा आनंद हा वेगळाच असल्याचे सचिन गुंड्ये यांनी सांगितले. गोरगरीब रुग्णांचे आशीर्वाद आपल्याला आणि सदिच्छा फाउंडेशनच्या पुढील कार्यासाठी तारणहार ठरतील. सदिच्छा फाउंडेशनच्या या कामात अध्यक्ष सचिन गुंड्ये यांना रूपेश बराम, विक्रांत वरिशे, अजिंक्य नेमन, राम वाडकर, अंकुश मेस्त्री, संजय गुंड्ये, नीलेश घाडी, स्वप्नश्री शिंदे, अमर कराडकर, शशिकांत शर्मा, गणेश आयरे, संदेश गुरव, प्रदीप कुंभार, संजय पालकर, श्रुती खेडेकर, विवेक पातेरे, संजीव पवार, संतोष चव्हाण, संतोष बावकर, नेहा मालकर आदींचे सहकार्य लाभते.