रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील प्रवासी शेडमध्ये खेडमधील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाला. प्रवीण जनार्दन साळवी (६५, रा. पटवर्धन लोटे, खेड) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. साळवी हे १० जानेवारीपासून साळवीस्टॉप येथील प्रवासी शेडमध्येच थांबलेले होते. याबाबत खबर देणाऱ्या दुकान मालकाने त्यांना नाव, गाव विचारले; परंतु त्यांनी काही सांगितले नव्हते. दरम्यान, १२ जानेवारीला दुकान मालक सकाळी साडेसातच्या सुमारास चप्पल दुकान उघडण्यासाठी गेला असता, त्यांना साळवी हे कोणतीही हालचाल करत नसल्याचे दिसून आले.
त्यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.