नाशिक : नाशिकसह राज्यभरात अवजड वाहतूक अतिशय धोकादायक पद्धतीने होत आहे. या वाहनांना टेल लॅम्प, लाल दिवा किंवा लाल रंगाचे कापड लावलेले नसते. अशा परिस्थितीत अवजड वाहतूक होत असल्याने अपघात होत आहे.
हे अपघात टाळण्यासाठी बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई होणार असून राज्यस्तरीय धोरण आखले जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली जाईल, असे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
द्वारका उड्डाणपुल येथे रविवारी (दि.१२) सायंकाळी आठच्या सुमारास सळ्या वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनावर पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाची धडक बसल्याने अपघात झाला होता. या भिषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बेकायदेशीररीत्या लांब व उंच लोड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न एेरणीवर आला आहे. यासंदर्भात महाजन यांच्यासह आ. सीमा हिरे व पोलिस प्रशासनाने अपघात स्थळाची पाहणी केली. त्यानंतर महाजन यांनी अवजड वाहनांचे अपघात रोखण्यासाठी धोरण आखले जाईल असे सांगितले. ते म्हणाले, अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून नियम डावलून वाहनाच्या बाहेर सळ्या ठेवून अवजड वाहतूक केल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाहनचालक व ट्रक मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्या कंपनीने स्टीलचा पुरवठा केला त्यांच्यावर देखील बेशिस्त वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. स्टीलची वाहतूक करताना संबंधित वाहनचालकाने स्टीलला लाल दिवा किंवा लाल रंगाचे कापड देखील लावलेले नसल्याचे उघड झाले. लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून राज्यभरामध्ये अवजड वाहतुकी दरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी धोरण ठरवले जाईल, असे महाजन यांनी सांगितले.
कायद्यांच्या अंमलबजावणीची गरज
गिरीष महाजन, जलसंपदा मंत्री.अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम आहेत, कायदे आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस, वाहन संघटना सोबत बैठक घेत चर्चा केली जाईल. अवजड वाहनांना लाल दिवा किंवा लाल रंगाचे कापड न लावता होणारी वाहतूक धोकादायक आहे. रिफ्लेक्टर, रेडियमचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे. बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई करावी, अशा सुचना केल्या आहेत.