मुंबई : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्याचा, विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढील शंभर दिवसाच्या आराखड्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवे डिजिटल माध्यम दोरण तयार करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर द्यावा, डिजिटल माध्यम धोरण तयार करून नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनीदिले.
शासकीय योजना, उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच वर्तमानपत्रे व ईलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारेही योजना, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
१०० दिवसांचा कृती कार्यक्रम
एआयच्या प्रभावी वापरावर भर देणार
सध्या अस्तित्वातील सर्व होर्डिंग हे डिजिटल होर्डिंगमध्ये बदलणार
माहिती जलदगतीने पोचविण्यासाठी यंत्रणा उभारणार
महासंचालनालयाच्या बळकटीकरणावर भर देणार
सोशल मिडियाचा प्रभावी वापर वाढविणार एकाच ठिकाणी माहितीसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष