रत्नागिरी:-कोणत्याही प्रसंगात खचून जाऊ नये. आत्मविश्वासाने मार्गक्रमणा करत राहावे, अशी शिकवण महाभारताने आपल्याला दिली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे केले.
या कीर्तनाने पाच दिवसांच्या कीर्तनसंध्या महोत्सवाची सांगता झाली.
येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपात महोत्सवाच्या कीर्तन महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी बुवांनी पांडवांच्या अज्ञातवासाची कथा सांगितली. बारा वर्षांच्या वनवासानंतर विराटनगरीत अज्ञातवासाकरिता जाताना पांडवांनी त्यांना मिळालेली अमोघ शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवासात असताना धर्मराजाला कंक, अर्जुनाला बृहन्नडा, भीमाला बल्लव, द्रौपदीला सैरंध्री, तर नकुल आणि सहदेवाला सेवेकऱ्याची कामे आणि नावे घ्यावी लागली. मोठ्या लोकांनासुद्धा कालगतीमुळे निम्नस्तराची कामे घ्यावी लागतात, कमीपणा घ्यावा लागतो. अशा स्थितीतही खचून न जाता ठामपणे उभे राहिले पाहिजे. किरकोळ काहीतरी मनाविरुद्ध घडले म्हणून निराशा येऊन आत्महत्या करण्याची वेळ आजकाल अनेकांवर येते. त्यांच्यासाठी हा मोठा बोध आहे. कठीण काळातही आपल्या उपास्य देवतेची आणि कर्माची उपासना केली, तर भगवंत आपल्याला नक्कीच साथ देतो, असेही या कथेतून स्पष्ट होते, असे बुवांनी सांगितले. कृष्णशिष्टाईपासूनचा महायुद्धापर्यंतचा महाभारताचा पुढचा पुढच्या वर्षीच्या कीर्तन महोत्सवात कथन केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.समारंभात अखेरच्या टप्प्यात अर्जुन आणि कृष्णाची रूपे साकारलेल्या बालकलाकारांचे श्रोत्यांच्या गर्दीतून व्यासपीठाकडे आगमन झाले, तेव्हा त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभात कीर्तनकार महेशबुवा सरदेसाई, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सन्मान करण्यात आला. माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे, सर्व वादक कलाकार, तंत्रज्ञ तसेच सर्व वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आभार मानण्यात आले.