रत्नागिरी:-पुण्यात या महिनाअखेर होणार असलेल्या विश्व मराठी संमेलनात प्रथमच भगवद्गीता, तुकोबांची गाथा आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांवर प्रथमच चर्चा होणार असल्याची माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा कीर्तनसंध्या परिवारातर्फे राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सामंत यांनीही आफळे बुवांचा सन्मान केला. त्यावेळी सामंत बोलत होते. ते म्हणाले, राज्य शासनातील मराठी भाषेचे मंत्रिपद माझ्या दृष्टीने सगळ्यात पहिल्या क्रमांकाचे आहे. मराठी ही जगभरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. याच विभागातर्फे येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीया काळात पुण्यात विश्व मराठी संमेलन भरणार आहे. राज्यात किती उद्योग आले आणि किती गेले याच्यावर फार मोठी चर्चा अडीच वर्षांमध्ये झाली. पण मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रचार किती झाला ही सध्या आत्मचिंतनाची बाब आहे. मात्र, माझ्या खात्यापेक्षा प्रचार आणि प्रसाराचे काम कीर्तनसंध्या महोत्सव जास्त करतो आहे. म्हणून माझ्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.सामंत म्हणाले, सलग तीन वर्षे मराठी भाषेची विश्व मराठी संमेलने झाली, पण तिसऱ्यांदा मी मंत्री झाल्यानंतर त्याचे थोडे स्वरूप बदलले आणि आपल्या मराठी संस्कृतीतले ग्रंथदेखील या संमेलनामध्ये असावेत, असा विचार केला. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा असे ग्रंथ पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. त्यासाठीच या ग्रंथांवर विश्व संमेलनामध्ये पहिल्यांदाच चर्चा होणार आहे. विश्व संमेलनातील त्या चर्चेकरिता आफळेबुवांची मदतही लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.