भंडारा : मधाच्या हव्यासापोटी व त्यातून दोन पैसे मिळतात, म्हणून मधमाश्यांच्या पोळ्याला आग लावून कीटकनाशक फवारून ते नष्ट करण्याचा प्रयत्न होत असतो, मात्र हा प्रयत्न तुम्हाला महागात पडू शकतो.
वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये मधमाश्यांच्या संदर्भात उल्लेख असून, कलम ५०, ५१ नुसार तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपये ते एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो. आग लावून ते नष्ट करणे अयोग्य असून, तो कायद्याने गंभीर गुन्हा आहे.
निसर्गाच्या जीवनचक्रामध्ये मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मधमाश्या परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परागीभवन, म्हणजे वनस्पतीमधील प्रजननाचा महत्त्वाचा भाग. परागीभवन झाले, तरच वनस्पती आपले बीज तयार करू शकतात.
मोहोळ अडचणीचे ठरल्यास जवळच्या मोहोळ होळणाऱ्या माहीतगार व्यक्तीला बोलावून त्याला उठून लावावे. एकदा दोनदा मोहळ उठून लावल्यानंतर ते पुन्हा त्या जागेवर येण्याचे टाळते. मधमाश्यांच्या परागीकरणावरच पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे मधमाश्यांचे पोळे अघोरीपणे नष्ट करणे कायद्याने गुन्हा ठरेल.
“मधमाश्यांशिवाय वनस्पतीमधील परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. आइनस्टाईनच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवरून मधमाश्या संपल्या, तर परागीभवन थांबेल आणि परागीभवन थांबले, तर वनस्पतीचे बीज तयार होणे थांबेल. सरळसरळ विचार केला, तर उत्पन्न घटेल. परिणामी, आपल्या अन्नाचा तुटवडा निर्माण होऊन माणूस मधमाश्यांशिवाय फक्त चार वर्षे जगू शकेल.”
– प्रा. अशोक गायधने, कार्यवाह, ग्रीनफ्रेंड्स, लाखनी
“जर कोणी मधमाश्यांचे पोळे जाळले किंवा त्यावर औषध फवारून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर तो एक गंभीर गुन्हा आहे. या कृतीमुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच; पण मधमाशांही नष्ट होतात. शिवाय कायद्याचेही उल्लंघन होते. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये कलम २ (३१) मध्ये मधमाश्यांच्या पोळ्याच्या संदर्भात स्पष्ट उल्लेख असून, कलम ५०, ५१ नुसार तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.”
– नदीम खान, माजी मानद वन्यजीव रक्षक, भंडारा.