पोस्ट कार्यालय परिसरात फलकच नाही, नागरिकांमधून नाराजी
राजापूर : तळकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी राजापुरात असलेल्या पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्राचा फलक नसल्याने परगावाहून पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना शोधाशोध करावी लागत आहे.
राजापूर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी या पासपोर्ट सेवा केंद्राचा लाभ होत आहे. मात्र राजापूर पोस्ट कार्यालयाच्या परिसरात पासपोर्ट सेवा केंद्राचा उल्लेख असणारा साधा बोर्ड देखिल लावण्यात न आल्याने दूरहून पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हे पासपोर्ट सुविधा केंद्र नेमके कोठे आहे हे समजत नाही. काही वेळा तर पोस्टाच्या पुढे आलेले नागरिक रस्त्यावर कोठेही आपली वाहने उभी करतात आणि शोधून त्या पासपोर्ट केंद्रामध्ये आपल्या कामासाठी जातात. त्यामुळे मुळात अरुंद असलेल्या त्या मार्गावर बऱ्याचवेळा वाहतूक कोंडी होते.
यापूर्वी अनेकवेळा मागणी होऊन सुध्दा संबंधित विभागाने पासपोर्ट सेवा केंद्राचा फलक लावलेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी तातडीने पासपोर्ट सेवा केंद्राचा बोर्ड लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.