परराज्यातील उमेदवारांना रूजू होऊ देणार नाही
चिपळूण : कोकण रेल्वेतर्फे विविध पदांसाठी संगणकाद्वारे होणारी निवड चाचणी परीक्षा ही पारदर्शक असावी तसेच या संगणक नोकऱ्यांसाठी कोकण रेल्वेमार्गासाठी जमीन गेलेल्या आणि स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात यावे, अशी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी मागणी केली आहे.
बाहेरच्या राज्यातील उमेदवार आम्ही रूजू होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
कोकण रेल्वेच्या १९० जागांसाठी १३ ते १६ जानेवारीपर्यंत संगणकावर निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात इलेक्ट्रिकल अभियंते, सिव्हिल अभियंते, स्टेशनमास्तर, गुड्स ट्रेन मॅनेजर, सिग्नलधारक, पर्यवेक्षक आदी जागांचा समावेश आहे. १९ जुलै १९९० मध्ये कोकण रेल्वेच्या मार्गासाठीची पायाभरणी झाली.
२६ जानेवारी १९९८ मध्ये कोकण रेल्वे मार्ग कार्यान्वित झाला. कायद्यानुसार रेल्वेमार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांत प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. रोहा (महाराष्ट्र) ते ठोकूरपर्यंत (कर्नाटक) कोकण रेल्वेला जमीन गेलेले ३६ हजार ७०० भूपीडित आहेत. सुमारे ३ हजार ९४ भूपीडित लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. बाकी अजून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. २०१९ मध्ये कोकण रेल्वेत विविध पदांसाठी झालेल्या जागा ”लँड लूजर”ना डावलून सोलापूर व पुणे डिव्हिजनच्या उमेदवारांची कोकण रेल्वेस्टेशन मास्टरच्या पदांसाठी निवड केली गेली होती व याची मंत्री वेणू नायर यांनी २०२१ मध्ये रत्नागिरी येथे कबुली दिली होती.