रत्नागिरी:-रत्नागिरीच्या समुद्रात होणाऱ्या अवैध मासेमारीविरुद्ध कस्टम विभागाकडून धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. सोमवारी सलग तिसरी कारवाई करत एलईडी दिवे लावलेला ट्रॉलर विभागाकडून जप्त करण्यात आला. भगवती जेटी येथील लाईट हाऊस पासून 4 सागरी मैलावर हा ट्रॉलर उभा असल्याचे कस्टमच्या अधिकाऱ्याना आढळून आले होते. अधिक तपासणी केली असता त्यामध्ये 4 खलाशाची, 56 एलईडी लाईट, 500 लिटर डिझेल, जनरेटर आदी आढळून आले, सातत्याने कस्टम विभागाकडून होत असलेल्या कारवाईमुळे अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मागील तीन दिवसापासून कस्टम विभागाने अवैध मासेमारी विरुद्ध मोहिमच हाती घेतली आह़े. दोन एलईडी ट्रॉलर पकडल्यानंतर या कारवाईला वेग आला आहे. सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कस्टमचे निरीक्षक अभिषेक शुक्ल व सहकारी गस्त घालत होते. यावेळी लाईट हाऊस पासून 4 सागरी मैलावर एक नौका कस्टमच्या अधिकाऱ्यांना दिसून आली. मच्छीमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या या नौकेवर कोणतेही मासे पकडण्याचे जाळे नसल्याने संशय निर्माण झाला. यावेळी कस्टमच्या अधिकाऱ्यानी नौकेची तपासणी केली असता त्यांना आतमध्ये एलईडी दिवे असल्याचे आढळून आले.
या नौकेवर चार खलाशी असून ही नौका पालघर डहाणू येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आली आहे. या नौकेवर मिळालेल्या कागदपत्रानुसार बोटीचे नाव सालीहा असे असून तिचा नंबर आयएनडी-एमएच-4-एमएम 1616असा आहे. ही नौका अस्लम आझाद सुवर्णदुर्गकर याच्या मालकीची असून असून रत्नागिरी राजिवडा येथील इब्राहिम सुवर्णदुर्गकर या व्यक्तीने चालवण्यासाठी घेतली असल्याचे आढळून आले. ही नौका स्वत मासेमारी न करता अन्य नौकांना मासेमारीसाठी एलईडी लाईट भाडयाने देत असते. या नौकेवरही मोठा जनरेटर शेकडो लिटर डिझेल व मोठया संख्येने एलईडी बल्ब आढळून आले.
या बोटीवर चार खलाशी आढळून आले असून त्यामध्ये सुभाष लहान्या ओझरे (40, ऱा ठाणे), मनेश लक्ष्मी हाडळ (18), कैलास संदीप काटेल (20) व एक अल्पवयीन कामगार असल्याची माहिती पुढे आली आहे. ही कारवाई कस्टमचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्ण व अधीक्षक पवन राठी यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक अभिषेक शुक्ल, सुखाणी गणेश माने, व तीन मरीन स्टाप यांनी केली कारवाई करण्यात आलेला ट्रॉलर कस्टमने पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाकडे हस्तांतरीत केली आहे. कस्टम विभाग या ट्रॉलरवर पुढील कारवाई करेल असे कस्टम विभागाकडून सांगण्यात आले आहे.