सचिन मोहिते / देवरुख:-सह्याद्रीच्या कडेकपारीत मारळ नगरीत मार्लेश्वर तीर्थक्षेत्री आज 14 जानेवारी रोजी साक्षात आंगवलीचा श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजा देवी यांचा कल्याणविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळयासाठी मारळ नगरी सज्ज झाली आहे. लाखो भाविक तीर्थक्षेत्री दाखल झाले आहेत.
मकरसंक्रांतीला श्री देव मार्लेश्वर व गिरीजा देवी यांचा कल्याणविधी सोहळा पार पडतो. याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. आंगवली मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवाचा चांदीचा मुळ टोप तेथेच असल्याने देवाच्या विवाहापुर्वीचे सर्व विधी आंगवली मंदिरात पार पडतात. येथील मानकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री देवाला हळद लावण्याचा तसेच विवाहपूर्वीचे पारंपरिक विधी घाणा भरणे, विडा भरणे, महाप्रसाद, नवस बोलणे-फेडणे असे विधी थाटात पार पडले. रात्री मनोरंजनासाठी होम मिनिस्टर अंतिम फेरी कार्यक्रम पार पडला. यानंतर देवाची मूर्ती, चांदीचा टोप प्रथेप्रमाणे सजविलेल्या पालखीत ठेवून पालखी शिखराकडे प्रयाण केले.
तत्पुर्वी सांयकाळी विवाह सोहळयाचे यजमानी व्याडेश्वर देवाची पालखी व साखरप्याची गिरीजा देवीची पालखी, आंबव व लांजा येथील दिंडया व वांझेळेची कावड मार्लेश्वर शिखरांकडे नियोजीत ठीकाणी रवाना झाली. आज रोजी पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी टाकणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, साखरपुडा झाला. याचवेळी कल्याणविधीचे वेळ ठरविण्यात येणार आहे. यानंतर कल्याणविधीसाठी पालख्या गाभाऱ्यासमोरील सभामंडपात आणून विवाहासाठी 360 मांकर्याना मानकऱ्याना रितसर निमंत्रण दिले जाणार आहे. यानंतर मुहुर्तावर श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवीचा कल्याणविधी सोहळा हिंदू धर्मातील लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून पार पडणार आहे. करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे अहे. रायपाटण, लांजा, मार्लेश्वरचे मानकरी व विश्वस्त यांच्या पौरोहित्याखाली हा विवाह सोहळा सुमधुर मंगलाष्टाके, सनई चौघडे, फटाक्यांची आतषबाजीने लाखो भाविकांच्या साक्षीने संपन्न होणार आहे.