रत्नागिरी:-बांगलादेशी रोहिंगे भारत अस्थिर करण्यासाठी आले आहेत. एकाही बांगलादेशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यांना कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केलाच तर बांगलादेशी नागरिकांसहीत आश्रय देणाऱ्याना सुद्धा बांगलादेशात पाठवून देऊ असा इशारा बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सोमवारी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे बंदरे, मत्स्य व्यवसाय, पत्तन, कस्टम, पोलीस, महसूल आदी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. आढावा बैठकीनंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सागरी सुरक्षा, एलईडी मासेमारी, पर्ससीननेट मासेमारी, किनारपट्टीवर अनधिकृत बांधकाम यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्यो मंत्री राणे यांनी सांगितले आहे. काही बंदरांतून देशविरोधी कारवाया केल्या जात आहेत. त्यावर आपल्या विभागाचे लक्ष आहे. त्या कारवाया तात्काळ थांबल्या पाहिजेत. याबाबतची माहिती आपण पोलिसांना दिली आहे. पोलीस त्याबाबतची कारवाई करतील असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. रत्नागिरीतील प्रमुख बंदरांसह मिरकरवाडा बंदरावर राज्य, केंद्र सरकारच्या माध्यमातून खर्च झालेल्या निधीचा अहवाल राणे यांनी अधिकाऱ्यांकडून मागविला आहे.