सिक्कीम येथील बंधारा दुर्घटनेत सैनिकांची अख्खी टीम गेली वाहून
रायगड : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असलेल्या नारंगी गावचे सुपुत्र शहीद सुयोग अशोक कांबळे यांना रविवारी भारतीय सैन्य दलातर्फे आदरांजली देण्यात आल्याबरोबर शासकीय इतमानांत नारंगी येथे मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी शहीद कांबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी हजाराचा जनसमुदाय उपस्थित होता.अलिबाग मार्गावरील कारले खिंड ते नारंगी गावापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली, यावेळी शहीद जवान सुयोग कांबळे अमर रहे या घोषणां देण्यात आल्या.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असलेल्या नारंगी बौद्ध वाडी येथील रहिवासी असलेले सुयोग कांबळे हे भारतीय सैन्य दलात हवालदार या पदावर कार्यरत होते. सिक्कीम मध्ये कर्तव्य बजावत असताना अचानक येथील धरणातील बंधारा फुटला आणि धरणाच्या पाण्यामध्ये त्यांची संपूर्ण तुकडी वाहून गेली होती .अनेक जण गाडले गेले होते, या घटनेनंतर सिक्कीम सरकारतर्फे त्यांचा शोध घेण्यात आला परंतु ते सापडले नाहीत, त्यामुळे त्यांना सैन्य दलाकडून शहीद म्हणून घोषित करण्यात आले.
सुयोग कांबळे यांना शहीद घोषित केल्यानंतर त्यांना शासकीय इतमामात नारंगी येथे मानवंदना देण्यात आली. रविवारी सकाळी कारले खिंड ते नारंगी पर्यंत रॅली करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. हजारोच्या संख्येने नागरिक हातात तिरंगा घेऊन रस्त्याच्या कडेला उभे होते, त्यानंतर नारंगी येथील शहीद कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रमराव पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह शासकीय अधिकारी, सैन्यदातील अधिकारी, शाळेतील विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी शहीद सुयोग कांबळे यांचे खारेपाट मध्ये भव्य स्मारक उभारणार असल्याचे जाहीर केले.