जाकादेवी : जाकादेवी येथील हृदयविकाराने त्रस्त असलेल्या ८ वीतील एका विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केली. त्यांनी या पद्धतीने मदतीचा हात देत दातृत्वाचा सकारात्मक संदेश दिला.
मालुगंड येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय आणि बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत म्हणाल्या, शिक्षणाच्या आड परिस्थिती येत नाही. चिकाटी जिद्दीच्या बळावर आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवावे, विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही सांगितले.
संबधित विद्यार्थी गेली काही वर्षे हृदयविकाराने त्रस्त असून उपचारासाठी खूप मोठा खर्च येणार असल्याचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगून शिक्षणविभागातून वैद्यकीय मदत मिळण्यासाठी आवाहन केले होते, यावर सुवर्णा सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः रोख रक्कम १५ हजार देऊन विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी मोठा हातभार दिला आहे. शिवाय शिक्षण विभाग अथवा शासकीयस्तरावरून अधिक
आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही सांगितले. या कार्यक्रमाला सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सीईओ किशोर पाटील, सल्लागार विलास राणे, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर, जाकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे, मुख्याध्यापक श्रीशैल्य पुजारी, अरुण जाधव, पांडुरंग पानगले, कमलाकर हेदवकर, पर्यवेक्षक शाम महाकाळ उपस्थित होते.