सावर्डे/संदीप घाग:-मारळ गावातील ऐतिहासिक व पवित्र श्री देव मार्लेश्वर मंदिरात आमदार शेखर निकम यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून मनोभावे पूजा केली. देव मार्लेश्वर यांना अभिषेक करून त्यांनी मतदारसंघातील सर्व जनतेला सुख-समाधान आणि भरभराट लाभावी, तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शक्ती मिळावी, असा आशीर्वाद मागितला.
यावेळी मार्लेश्वर मंदिर समिती व ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचा यथोचित सत्कार केला.
आमदार शेखर निकम यांनी यात्रोत्सवात सहभागी भाविकांशी संवाद साधत त्यांचे सुख-दु:ख जाणून घेतले. त्यांनी ग्रामस्थांकडून मार्लेश्वर परिसरातील विकासात्मक गरजांविषयी माहिती घेतली आणि यावर सकारात्मक चर्चा केली. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, भाविकांसाठी निवास व्यवस्था, आणि इतर सुविधांबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर, आमदार शेखर निकम यांनी श्री देव मार्लेश्वर मठाला भेट दिली. त्यांनी मठाच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करत भाविकांसाठी आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
यात्रोत्सवात सहभागी झालेले असंख्य भाविक, स्थानिक पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांचे स्वागत केले. मार्लेश्वर यात्रोत्सव हा ग्रामस्थांसाठी आणि भाविकांसाठी एक पवित्र व हृदयस्पर्शी सोहळा असल्याचे आमदार निकम यांनी नमूद केले.
श्री देव मार्लेश्वराच्या आशीर्वादाने या पवित्र भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिले.