रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यात पिंपळदरी या गावामध्ये सहा बांगलादेशी घुसखोरांना औद्योगिक वसाहत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती महाड औद्योगिक वसाहतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
महाड पंढरपूर भोर मार्गावर असलेल्या पिंपळदरी या गावांमध्ये काही बांगलादेशी घुसकरांचे वास्तव्य असल्याची माहिती औद्योगिक वसाहत पोलीसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांचे पथक पिंपळदरी गावामध्ये पोहोचल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली, गावातील घराघरातून तपासणी केली जात असताना सुमारे १८ पेक्षा अधिक संशयित बांगलादेशी घुसखोर आढळून आले. सर्व संशयीत घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे, रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत सहा संशयित बांगलादेशी घुसखोरांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर हे सर्वजण बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित १२ संशयित बांगलादेशी घुसखोरांची पोलीस चौकशी करीत आहेत.
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बांगलादेशी घुसखोर राहात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर बांगलादेशी घुसखोराची शोध मोहीम अधिक गतीने सुरू करण्यात आली.नवी मुंबई, वाशी, मुंबई, पुणे,मालेगाव, भिवंडी, ठाणे इत्यादी महत्त्वाच्या शहरातून बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले, रायगड जिल्ह्यातील विविध शहरातून त्यांचे वास्तव्य असताना रायगड पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून कसून तपासणी मोहीम सुरू केली आहे.दरम्यान अलिबाग येथील दंगल विरोधी पथक महाड शहरांमध्ये दाखल झाले आहे, या पथकाकडून औद्योगिक वसाहत तसेच या परिसरातील विविध गावातून शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.तसेच पोलिसांनी ६ संशयित बांगलादेशी घुसखोरांसह १८ जणांना ताब्यात घेतल्या नंतर त्यांची देखील कसून चौकशी करण्यात येत आहे
महाड तालुक्यामध्ये बांगलादेशी असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू असताना पोलिसांना माहिती मिळताच रविवारी सायंकाळी पोलिसांनी पिंपळदरी गावामध्ये राहत असलेल्या बांगलादेशींवर कारवाईमुळे महाड पोलादपूर तालुक्यातील बांधकाम व्यवसायासह अन्य ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मागील काही दिवसापासून महाड औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखानदारांना आपल्या येथे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना गावात राहणाऱ्या परप्रांतीयान संदर्भात सविस्तर माहिती देण्याची सूचना पोलिसांनी केली होती. त्याप्रमाणे या परिसरातील सुमारे १८ ते २० कारखानदारांकडून याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.
महाड एमआयडीसी सह तालुक्यात विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली आहे. सर्व नागरिकांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या परप्रांतीयांसंदर्भात विशेष करून बांगलादेशी नागरिकांचा संदर्भात काही माहिती मिळाल्यास ती त्वरित स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवावी असे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.