राजापूर : शहरातील रानतळे येथील नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू असतानाच रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्याने लगतच असलेल्या भू रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना गंभीर जखमी असल्याने अन्यत्र हलविण्यात आले आहे. यातील दुचाकीचालक असमालान रफीक मुजावर हा या स्कूलमधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे, तर दुसरी जखमी कु. सुंबुल समीर जवाहिरे ही अन्य शाळेतील विद्यार्थिनी आहे.
रविवारी रानतळे येथील नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस होता. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू असतानाच बाहेरील भू रस्त्यावर हा अपघात घडला. यातील दुचाकीवर असलेले दोघेहीजण झालेल्या अपघातात रस्त्यानजिकच्या चरात दुचाकी पडल्याने गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच या दोन्ही जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर असमालान याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी, तर सुंबुल हिला कणकवली येथे नेण्यात आले. यादरम्यान पोलीसही ग्रामीण रूग्णालयात पोहोचले होते. मात्र उपचार फ्रक्रियेला प्राधान्य देण्यात आल्याने पोलिसांनी अपघाताची माहिती गोळा करण्याचे काम आता हाती घेतले आहे. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या असलामान याला पुढील उपचारासाठी रत्नागिरीहून मिरज येथे नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या अपघातप्रकरणी अधिक माहिती राजापूर पोलीस घेत आहेत.