चिपळुणात दीड लाखाची लाच घेताना पकडले होते रंगेहाथ
चिपळूण : दीड लाख रुपये स्वीकारताना खेड न्यायालयातील सरकारी वकील राजेश जाधव याला गुरुवारी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी शुक्रवारी त्याला येथील न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांनतर शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला.
यातील तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग 1, खेड यांच्या न्यायालयात वकीलपत्र घेतले आहे. सरकारी पक्षाच्यावतीने ही केस राजेश जाधव (विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता) हे पाहत होते. असे असताना 26 डिसेंबर 2024 व 3 जानेवारी 2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल असे प्रयत्न करेन, जास्त सरतपास न घेता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली असता त्यापैकी दीड लाख रुपये स्वीकारताना चिपळूण शहरातील एका हॉटेलमध्ये रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शुक्रवारी जाधववर गुन्हा करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाला.
त्या लाचखोर सरकारी वकिलाला जामीन
