चिपळूण : सर्वोच्च न्यायालयाने सक्शन पंपाद्वारे वाळू उपशावर बंदी घातली असतानाही चिपळुणातील खाडी पट्ट्यात कोणाच्या आशिर्वादाने वाळू उत्खनन सुरु आहे? असा थेट सवाल चिपळूणच्या तहसीलदारांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केला असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे वाळूची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर वाळूप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
चिपळूणच्या तहसीलदारांना सहा जानेवारी रोजी केलेल्या पत्रव्यवहारात जिल्हाधिकायांनी नमूद केले आहे की, तुमच्या अखत्यारित असलेल्या करंबवणे, मालदोली गावातून अवैधरित्या, बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सक्शन पंपाने वाळू उत्खनन करण्यावर बंदी घातली आहे. तरीदेखील चोरट्या पद्धतीने बेसुमार वाळू उपसा होतं आहे. याविरोधात या परिसरातील ग्रामस्थांनी तुमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु तीन वेळा तक्रार अर्ज देवूनही आपण कारवाई केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याप्रकरणी आपण तात्फाळ लक्ष देऊन आणि अनधिकृत वाळू उपसाविरोधात नियमानुसार कारवाई करावी आणि त्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असा लेखी आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.
खेडमधील अब्दुल्ला हुसेन नाडकर यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे चिपळूणचे तहसीलदार अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, चिपळुणात कोठेही अनधिकृत वाळू उपसा होत नसल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. वाळूची चोरी रोखण्यासाठी ठिकठिकाणी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय नागरिकांच्या तक्रारींची सुध्दा दखल घेतली जात आहे. तरीही कोणी लपूनछपून वाळू उपसा करत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.