रत्नागिरी : खोल समुद्रात पर्ससीन नौकांना एलईडी लाईट दाखवून मच्छीमारीसाठी सहाय्य करणारी नौका कस्टम विभागाच्या गस्ती पथकाने मिरकरवाडा पासून दहा वाव समुद्रात ताब्यात घेतली. या नौकेवरील साहित्य जप्त करण्यात आले असून, ही नौका मत्स्य विभागाच्या ताब्यात दिली जाणार आहे. दरम्यान, या कारवाईमुळे मच्छीमारीची आणखी एक पध्दती पुढे आली आहे.
खोल समुद्रात 10 ते 25 वाव दरम्यान पर्ससीन नौका मच्छीमारी करीत असतात. खोल समुद्रात मोठ्याप्रमाणात मच्छी मिळावी यासाठी आता एलईडीचा वापर सुरु झाल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे. सापडलेल्या नौकेच्या चारी बाजूने एक हजार ते आठशे वॅटचे मोठे एलईडी बल्ब लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे पाण्यास सोडता येणारे बल्बही आढळून आले आहेत. हे बल्ब खोल पाण्यात सोडून मासे आकर्षित माशांना आकर्षित केले जाते आणि त्यानंतर पर्ससीन नौका या माशांना पकडतात. या नौकेवर जवळपास सहाशेहून अधिक लिटर डिझेल, मोठा जनरेटर सापडला आहे.
कस्टम विभागाने नौकेवरील चारहीजणांना ताब्यात घेतले असून, यात एक तांडेल व तीन खलाशी आहेत. यातील तीनही खलाशी हे नेपाळी असून तांडेल कर्नाटकातील असल्याची माहितीही कस्टमच्या अधिकार्यांनी दिली. मासेमारीचा हा नवा प्रकार या कारवाईने पुढे आणला आहे.
कस्टमचे सहायक आयुक्त संदीप कृष्णा, अधीक्षक पवन राठी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक राजेश लाडे, निरीक्षक रमेश गुप्ता व आठ कर्मचार्यांनी ही कारवाई केली. जप्त केलेली नौका व साहित्य मत्स्य विभागाच्या ताब्यात दिले जाणार आहे.