खेड : कोकण रेल्वेत सीटवरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना खेड रेल्वे स्थानकावर घडली. या मारहाण प्रकरणातील 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे दखल केले आहेत. या भानगडीचा फटका कोंकण रेल्वेला बसला. त्यामुळे जवळपास अर्धा तास एलटीटी-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेस उशिरा धावली.
दरम्यान या एक्स्प्रेसमध्ये जनरल डब्यात जागेवरून शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास येथील स्थानकात दोन गटात राडा झाला. एका प्रवाशाला चार प्रवाशांनी पनवेल स्थानकात केलेल्या मारहाणीचे पडसाद येथील स्थानकात उमटले.
नेत्रावती एक्स्प्रेसमधील जनरल डब्यातून प्रवासी प्रवास करत होते. नेत्रावती एक्स्प्रेस पनवेल स्थानकात आली असता परराज्यातील काही प्रवाशांनी स्थानिक प्रवाशांना धक्काबुक्की केली होती. धक्काबुक्की केल्याचा प्रवाशांनी जाब विचारला असता उद्धट उत्तरे दिल्याच्या रागातून एकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर दोन गटात अक्षरश: सिनेस्टाईल तुफान हाणामारी झाली. या प्रकारानंतर नेत्रावती एक्स्प्रेस येथील स्थानकात अर्धा तास थांबवण्यात आली. घडलेल्या प्रकाराबाबत येथील पोलिसांना कळवल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानकात राडा करणाऱ्या दोन्ही गटातील 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत येथील पोलीस ठाणेत आणले.त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या हाणामारीचा काही प्रवाशांनी आनंद लुटला तर ज्यांना घाई होती त्यांनी मात्र अर्धा तास रेल्वे लेट झाल्यामुळे शिव्यांची लाखोली वाहिली.