डॉक्टरांचे मानले आभार
चिपळूण:-येथील डेरवण रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांकडून आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता डेरवण रूग्णालय हे रुग्णांना नवसंजीवनी देणारे रुग्णालय म्हणून ओळखले जात आहे. रत्नागिरीतील एका 35 वर्षीय महिलेला ऐकू कमी येण्याचा त्रास होत होता. अनेक ठिकाणी औषधोपचार केल्यानंतरही हा आजार बरा होत नव्हता. अखेर या महिलेने डेरवण येथील वालावलकर रुग्णालय गाठले. येथील कान-घसा विभागातील डॉ. राजीव केणी आणि डॉ. प्रतिक शहाणे यांना दाखवले. तिच्या ऐकू न येण्याचे कारण कानाचा पडदा फाटणे, कानाच्या हाडांमध्ये रोग असणे किंवा वयोमानानुसार नस कमजोर होणे यापैकी एकही कारण नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या ऑडिओमेट्री आणि इम्पिडन्स या दोन टेस्ट केल्या असता कानाच्या आतील सूक्ष्म हाडे फिक्स झाल्यामुळे तिला ऐकायला येत नाही. हे निदान लक्षात येताच डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
महिलेने लगेच शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखवली. डॉ. राजीव केणी आणि डॉ. प्रतिक शहाणे यांनी अतिशय कुशलतेने कानातील सूक्ष्म हाडाचे मायक्रोस्कोपिक ऑपरेशन यशस्वी केले. शस्त्रक्रियेनंतर ऐकू यायला लागल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान होते. अतिशय अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल डॉ. केणी व डॉ. शहाणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.