ग्रामस्थांसह अग्निशमन यंत्रणाची उडाली तारांबळ
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथील सुरुबानात गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास अचानक वणवा पेटला. सुकी लाकडे आणि गवतानी पेट घेतल्याने आगीचे तांडव निर्माण झाले. रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीने साऱ्यांची धावपळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आवाक्याबाहेर असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना शुक्रवारची पहाट उजाडली. मात्र आटोक्यात आणलेली आग या दिवशी सकाळी पुन्हा भडकल्याने ती दुपारी पुन्हा नियंत्रण आणण्यात यश आले.
काळबादेवी येथील सुरुबनात आग लागल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सुरूबनात आग लागल्याची माहिती येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील यांना देण्यात आली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील आदेश कदम आणि ग्रामपंचायत सदस्य समीर शेटये यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुबनात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. लागलेली आग आटोक्यात आणण्यात मर्यादा येत असल्याने तत्काळ रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचा विळखा वाढत गेल्याने दुसऱ्या बंबालाही बोलावण्यात आले. अखेर शुक्रवारी पहाटे 3 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, विझलेली आग शुक्रवारी सकाळच्या सुमारास पुन्हा भडकली. वणवा पुन्हा लागल्याचे लक्षात येताच पुन्हा रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला बोलावण्यात आले. अथक प्रयत्नानंतर दुपारच्या सुमारास आग पुन्हा आटोक्यात आणण्यात आली. याविषयी येथील वनविभागाकडे संपर्क साधला असता सुरूबनातील सुमारे 20 ते 25 गुंठयातील क्षेत्रातील गवत, झाडी झुडपे होरपळल्याचे सांगण्यात आले.