रायगड:-जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या कडाव येथील मंडल अधिकाऱ्याला रायगड विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (८ जानेवारी) एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या कडाव येतील मंडल अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे याने तक्रारदारा कडून एक लाख रुपयाची मागणी केली होती. तक्रारदार यांना अत्यारपत्र दिलेल्या इसमाचे मौजे दहिगाव, तालुका कर्जत येथे नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केलेले जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करून घ्यायचे होते, ते मंजूर करून देण्यासाठी मंडळ अधिकारी केंडे याच्याकडे अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करून घेण्यासाठी मंडल अधिकारी चंद्रकांत केंडे याने तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदाराने रायगड विभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीवरून बुधवारी ८ जानेवारी रोजी मंडल अधिकारी कार्यालया परिसरामध्ये सापळा लावण्यात आला, तक्रारीची खात्री करून घेतल्या नंतर एक लाख रुपये पंचांच्या समक्ष तक्रारदारा कडून केंडे स्वीकारत असताना त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी केंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, पोलीस हवलदार महेश पाटील, सचिन आटपाडकर, सागर पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.