मंडणगड : पालवणी, गोसावीवाडी येथे जावयानेच सासूच्या घरात चोरी करून मंगळसूत्र चोरल्याची घटना ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शंकर गोसावी (रा. भादाव, माणगाव, रायगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जावयाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद शिवाजी पांडुरंग नवघरे (मंडणगड, गोसावीवाडी) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३ जानेवारी रोजी ते आणि त्यांची पत्नी गावातील बचत गटाच्या मिटींगमध्ये गेले होते. याचवेळी घरी राहण्यास आलेल्या जावई समीर गोसावी याने घरातील बेडरुममधील कपाट उघडून कपाटातील दोन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. त्याची किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे. या चोरीप्रकरणी नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जावई समीर शंकर गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.