कृषी प्रदर्शनात अनेक प्रकारचे पशुधन ठरतेय खास आकर्षण
चिपळूण:- वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लिमिटेड तर्फे शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. विनायक सावरकर मैदानात कृषी व पशुसंवर्धन महोत्सव सुरू आहे. या महोत्सवमध्ये पशुधन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याच कृषी महोत्सवात हिंदकेसरी गजेंद्र रेडा, सर्जा, युवराज आणि शंकर अशा अनेक प्रकारचे रेडे सुद्धा बघण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे.
चिपळूण येथे ५ जानेवारी रोजी सुरू झालेले कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन महोत्सवामध्ये अनेक प्रकारची खास आकर्षण आहेत. यामध्ये खरंतर बकासुर बैल याची मोठी हवा आहे. त्यानंतर आता याच कृषी महोत्सवामध्ये हिंदकेसरी गजेंद्र रेडा पाहण्यासाठी सुद्धा लोकांची आणि शाळेतील मुलांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर युवराज रेडा हा कोल्हापुर येथून आलेला आहे. निपाणीतून शंकर रेडा प्रदर्शनात आणला आहे. असे अनेक पशुधन कृषी महोत्सवामध्ये पहायला मिळतात. पशुधनांची वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या जाती या महोत्सवांमध्ये नागरिकांना पाहायला मिळत आहे.
याच महोत्सवमध्ये पांढरवस्ती बारामतीतील सहा किलोचा कोंबडा सुद्धा प्रदर्शनात पाहायला मिळतोय. याच कृषी प्रदर्शनात अनेक प्रकारचे घोडे सुद्धा आहेत. यामध्ये रावण हा घोडा खास आकर्षण ठरत आहे. कोकणी कपिला गाय सुध्दा प्रदर्शनामध्ये लोक आवर्जून पाहत आहेत. अडीचशे किलो किमान वजन असलेली कपिला गाय या कोकणातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी असणारे हे पशुधन आहे. मात्र घाट माथ्यावरून आलेले पशुधन पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने कृषी महोत्सवामध्ये लोकांची गर्दी होत आहेत. गजेंद्र रेडा हा गेल्या वर्षी सुद्धा कृषी महोत्सव मध्ये खास आकर्षण ठरला होता. यावर्षी सुद्धा गजेंद्र रेडा पाहण्यासाठी लोक आवर्जून येत आहेत.
या कृषी महोत्सवात अनेक प्रकारचे पक्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या गाई या सुद्धा या कृषी प्रदर्शनमध्ये बघण्यासाठी उपलब्ध आहेत. कोकणातील पशुधन आणि घाट माथ्यावरील पशुधन यात निश्चित फरक आहे. शेती आणि पशू यांचे संबंध असून कोकणात आता हेच दुर्मिळ होत आहे. ग्रामीण भागातील जीवनशैली काय असते ते नेमकं या कृषी प्रदर्शनातं लोक पाहत आहेत. नव्या पिढीला हे कृषी प्रदर्शन खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरत आहे.