रत्नागिरी : बांग्लादेशी नागरिकाला शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्मदाखला दिल्याप्रकरणी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी चौकशी केली. चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सिंह यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचे संपूर्ण रजिस्टरही तपासण्यात आले. कोरोना काळामध्ये मे २०२० मध्ये हा जन्मदाखला दिल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांना एका गुन्ह्यात बांग्लादेशीय आरोपी सापडला आहे. मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या चौकशीनंतर या प्रकरणाची पाळेमुळे तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीशी जोडली गेल्याचे समोर आल्यावर येथे खळबळ उडाली. याबाबत मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस दिली आहे. शेख याला शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्मदाखला दिल्याची नोंद आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधीची चौकशी सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतीची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी लावली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर यामध्ये काय तथ्य आहे, हे स्पष्ट होईल, अशी माहिती जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.