वनविभागाची कारवाई
चिपळूण : टेरव येथील जंगलात गेल्या महिन्यात वनविभागाने कोळसा भट्टया उद्ध्वस्त करत तिघांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आता गेल्या आठवडयात पुन्हा दुसऱ्यांदा भट्ट्यावर कारवाई केली आहे. यामध्ये कोळसा भट्टी उद्ध्वस्त करताना तीस पोती कोळसाही जप्त करत भट्टी लावणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्टया धगधगत असल्याची तक्रार येत होती. दरवर्षी पावसाळयानंतर या जंगलात कोळसा भट्टया लावल्या जातात. त्यामुळे गावातील काही जागरूक नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला होता. वन विभागाला लेखी निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वन विभागाने कोळसा भट्टयावर धाड टाकली. या धाडीत कोळसा जप्त करण्यात आला. तर टेरव येथील तिघांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र कारवाईनंतरही कोळसा भट्टया पुन्हा सुरू करण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने गेल्या आठवडयात पुन्हा कारवाई केली आहे.
मौजे टेरव-लिंगेश्वरवाडी येथील लिंगेश्वर मंदिराच्या जवळच असलेल्या शेतात अवैधरित्या कोळसा भट्टी पेटवल्याबाबत वन विभागास माहिती मिळाल्यानंतर, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक कोळकेवाडीचे राहूल गुंठे यांनी टेरव गावचे पोलीस पाटील यांना घेऊन या ठिकाणी धाड टाकली. यामध्ये भट्टी उद्ध्वस्त करताना तीस कोळसा पोती वनविभाकडून जप्त करण्यात आली. ही कोळसा भट्टी टेरव गावचे नागेश यशवंत कदम यांनी लावलेली होती. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, परीक्षेत्र वनाधिकारी सरवर खान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सावंत, वनरक्षक गुंठे यांनी केली.
चिपळुणात बेकायदेशीर कोळसाभट्टीवर धाड, तीस पोती जप्त
