रत्नागिरी: रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाचे १४ वे पर्व बुधवारपासून (ता. ८) सुरू होणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारूदत्त आफळेबुवा महाभारतावरील निरूपण करणार आहेत. १२ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार आहे.
आफळेबुवांना केदार लिंगायत (तबला), प्रथमेश तारळकर (पखवाज), चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम), उदय गोखले (व्हायोलिन), अमेय किल्लेकर (एबल्टन) संगीतसाथ करणार आहेत. गेली तेरा वर्षे कीर्तनसंध्या महोत्सवात भारताचा देदीप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या वर्षी आयोध्येतील राममंदिर पुनर्निमाणाचे औचित्य साधून “आले रामराज्य” या विषयावर रामकथा, गीत रामायण आणि कीर्तन असा अनोखा कार्यक्रम साजरा झाला. यावेळीसुद्धा असाच एक ऐतिहासिक कालखंड आणण्याचा प्रयत्न करत आहे.