केज :- संतोष देशमुख हत्याकांडातील तीन आरोपींना बारा दिवसांची तर याच प्रकरणाशी सबंध असलेल्या खंडणी प्रकरणातील एका आरोपीला चार दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
या बाबतची माहिती अशी की, आज दी.६ जानेवारी रोजी संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्यासह आवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांना या चौघांना आज दुपारी १२:३० वाजता प्रचंड पोलीस बंदोबस्तात सरकारी वाहनातून केज पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
न्यायालयात हजर केला नंतर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले या तिघांच्या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्या नंतर खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांची सुनावणी घेण्यात आली. या चारही आरोपींची प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी श्रीमती एस. व्ही. पावस्कर यांच्या समोर हजर करण्यात आले होते. पावसस्कर यांनी या तिघांना १८ जानेवारी पर्यंत १२ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. तर खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला दि. १० जानेवारी पर्यंत ४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
या दोन्ही प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी तर आरोपींच्या वतीने ॲड. अनंत तिडके यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला.
न्यायालयात काय युक्तीवाद झाला
सरकारी वकील ॲड बाळासाहेब कोल्हे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला ताब्यात घेण्यासाठी आणि हा कट कसा रचला गेला सखोल चौकशी करून आरोपींची सीआयडी कोठडी वाढवून पाहिजे असल्याचा युक्तीवाद न्यायालयासमोर केला.
तर त्याला आरोपींच्या वकील ॲड. अनंत तिडके यांनी आक्षेप घेत हा खून कट रचून झालेला नसून आरोपींनी कट केल्याचे आढळून येत नाही. गुन्हा घडून ३० दिवस उलटत आहेत. मग तपास यंत्रणेने काय केले ? तसेच अटकेतील आरोपी काय शो-पीस आहेत काय? असा युक्तीवाद करीत त्यांना सीआयडी कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. पण या युक्तीवाद मान्य केला नाही.
मीडिया ट्रायलची चर्चा
न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी पुन्हा एकदा आज आरोपीच्या संदर्भात विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असणारे वृत्त याचा उल्लेख करीत हे प्रकरण मीडिया ट्रायल असल्याचा युक्तिवाद माननीय न्यायालय समोर केला. दरम्यान तपास यंत्रणेला माध्यमाद्वारे अनेक माहिती मिळत असल्याने त्यांना तपासाची दिशा आणि अधिक माहिती देखील मिळत आहे. परंतु बचाव पक्षाच्या वतीने माध्यमांच्या बाबतीत मीडिया ट्रायल असा उल्लेख होत आहे.
आरोपी कुणाशी संपर्क तर साधत नाहीत ना ?
आज दुपारी सरकारी वाहनातून पोलीस स्टेशन ते न्यायालयाने दरम्यान आरोपींना घेऊन जात असताना दुपारी ३:५२ ते दुपारी ३:५४ वाजण्याच्या दरम्यान वाहनातील एक जण मोबाईलवर बोलत असल्याचे दिसत होते. आरोपींच्या वाहनात मोबाईल कोण वापरत होते ? आरोपींच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांची देखील चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू आहे.