मुंबई:-महाराष्ट्रातून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतली आहे.उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा वेग धरला आहे.या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्र गारठला आहे.मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा पारा आणखी घसरला आहे.त्यामुळे राज्यात पुढील ३ दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमनान १ ते ३ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात कमालीची घट झाली असून गारठ्यामुळे लोकांना कापरं भरू लागले आहे. विदर्भातील यवतमाळचे तापमान ७.६ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तर सोलापूर, सांगली, पुणे गोंदिया आणि नगर याठिकाणी ८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये १० ते १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील किमान तापमानात घट बघायला मिळत आहे. मात्र, वाशिममधील किमान तापमान गेले काही दिवस स्थिर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यांत थंडीचा जोर कमी असण्याची शक्यता आहे. विदर्भात थंडीचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांची पिकांची आणि सर्व नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हंटले आहे. गोंदियातील किमान तापमान देखील पुढील काही दिवस कायम असणार आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र असेल असे हवामान विभागाने कळवले आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम असणार आहे. अकोला जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सध्या भारतामधील उत्तरेकडील राज्यातही थंडी प्रचंड वाढली आहे.अनेक राज्यात धुक्यांची दाट चादर पसरली आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये बर्फावृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळेच उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.