चिपळूण : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रत्नागिरीच्या चिपळूणमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावरून परत जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर दोन वेळा उडता उडता पुन्हा खाली आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.
हेलिकॉप्टरमध्ये शरद पवार आणि त्यांच्या सोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील होते.
वाशिष्टी डेअरी प्रकल्प आयोजित गेल्या वर्षी मिळालेल्या ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ अभूतपूर्व प्रतिसादानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात रविवारी ५ ते ९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शानाचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण नगर पालिकेच्या सावरकर मैदानात ३ दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात विविध क्षेत्रातील नामांकित उत्पादकांचे, कारखान्यांचे १०० स्टॉल्स सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. याच उद्घाटन समारंभाला पवार चिपळूणमध्ये आले होते.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शरद पवार चिपळूणहून जायला निघाले. मात्र त्यांचे हेलिकॉप्टर दोन वेळा उडता उडता पुन्हा खाली आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. ओव्हरलोडमुळे हेलिकॉप्टर टेक ऑफ झाले नसावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण एक व्यक्ती हेलिकॉप्टरमधून खाली उतरवण्यात आल्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच हेलिकॉप्टरचे सुखरूप उड्डाण झाले.