शनिवारी समुद्रामध्ये झेपावली 27 कासव पिल्ले
गुहागर:-यावर्षीच्या कासव जन्मोत्सवाला गुहागर समुद्रकिनाऱ्यावरून सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील पहिला मान गुहागरला मिळाला आहे. जिल्ह्यातील पहिले घरटे मिळून आलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी 27 कासव पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली.
यामुळे गुहागरमध्ये कासव जन्मोत्सवाला सुरुवात झाली असून पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. गतवर्षी गुहागर समुद्र किनाऱ्यावर 18,915 तर रोहिले आणि तवसाळ समुद्रकिनाऱ्यावर 3,165 कासव पिल्ले सोडण्यात आली. ऑलिव्हरिडले या जातीची ही कासव पिल्ले असून याचे प्रमाण दरवर्षी वाढताना पहावयास मिळत आहे. यावर्षी गुहागर समुद्रकिना ऱ्यावर 15 नोव्हेंबरला 117 अंड्यांचे पहिले घरटे मिळून आले.
वनविभागाच्यावतीने समुद्रकिनाऱ्यावर तीन कासव अंडी संवर्धन केंद्रे उभारण्यात आली असून आतापर्यंत एकूण 7 घटकांमधून 749 कासव अंडयंचे संवर्धन करण्यात आले आहे. तर तवसाळ समुद्रकिनाऱ्यावर 4 डिसेंबर 2024 रोजी 101 अंड्यांचे पहिले घरटे सापडले असून आत्तापर्यंत त्या ठिकाणी दोन घरट्यामधून 189 अंड्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. रोहिले समुद्रकिनाऱ्यावरही कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आले असून त्या ठिकाणी 21 डिसेंबर रोजी 97 अंडयाचे पहिले घरटे सापडले आहे.