चिपळूण : गुजरात येथील खैर तस्करीप्रकरणाचा तपास करताना दक्षिण मांडवी परीक्षेत्र वनविभागाकडून सावर्डे परिसरातील कात कंपनीची तपासणी सुरू आहे. या तपासणीत काही अवैध बाबी पुढे आल्याचे सांगितले जात असून वन अधिकाऱ्याकडून पुढील कारवाई सुरू आहे.
मांडवी दक्षिण परिक्षेत्रातील खैर तस्करी प्रकरणात मुस्ताक आदम तासिया हा प्रमुख आरोपी आहे. त्याचे फराळाचे दुकान आहे. त्याच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर सुप्रिम कोर्टात दाखल केलेला अर्जही फेटाळत मांडवी कोर्टात हजर करून पुढील कायदेशीर कारवाईत आत्मसमर्पण करा, असे आदेश दिले. त्यानंतर आरोपीचा ताबा सुरत वनविभागाच्या तपास पथकाला दिला गेला. दरम्यान वनविभागाच्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात असलेल्या एका कात कंपनीचे नाव पुढे आले. त्यानुसार मांडवी वनविभागाच्या अधिकाऱ्यानी शुक्रवारी या कात उद्योगावर छापा टाकून तपासणी सुरू केली. या चौकशीत काही आक्षेपार्ह बाबी पुढे आल्या आहेत. मात्र याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, यापूर्वीही गेल्या काही दिवसांत या परिसरातील कात कारखान्यांवर नाशिक वनविभागाने छापे टाकून काही कारखाने सील केले आहेत. जिल्ह्याबाहेरील वनविभागाकडून पडत असलेल्या छाप्यामुळे सावर्डे परिसर पुन्हा चर्चेत आला आहे.