देशभरात केलेल्या अभ्यासातून मिळाला महाराष्ट्राचा अहवाल
मुंबई:- भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून देशभरातील संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील समुद्र कासवांची संख्या, त्यांच्या सवयी, घरटे करण्याचे स्थान, घरट्यांमध्ये नव्याने उत्पत्ती होणाऱ्या कासवाचा अभ्यास केल्या जात आहे.
२०२३-२४ मध्ये देशभरात केलेल्या अभ्यासात महाराष्ट्रात ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची (समुद्री कासव) तब्बल २० टक्के घरटी असल्याचा पहिला अहवाल वन विभागाला मिळाला आहे.
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून लुप्त होत असलेल्या पक्षी, प्राण्यासह इतरही वन्यप्राण्यांचा अभ्यास करुन संशोधन करण्यात येते. त्याअंतर्गत भारत सरकारकडून देशभरातील समुद्र किनाऱ्यावरील समुद्री कासवाचा अभ्यास केला जाणार आहे.
हा प्रकल्प २३-२४ ते २८-२९ पर्यंत देशभरात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ७२० किलोमीटर लांबीच्या पश्चिम किनारपट्टीवर २०२३-२४ पासून या अभ्यासाला प्रारंभ झाला आहे. अभ्यासाचा अहवाल राज्य वन विभागाला मिळाला आहे.
या अहवालानुसार २०२३-२४ मध्ये दोन हजार ५८४ घरटी आढळून आली आहेत. २०२२-२३ मध्ये घरट्यांची संख्या एक हजार ३८७ होती. ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (डब्ल्यूआयआय)ने केलेल्या अभ्यास त्यात दुप्पटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील समुद्री कासवांच्या घरट्यांपैकी २० टक्के घरटी महाराष्ट्रात असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
राज्यातील समुद्र किनारा असलेल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत हा अभ्यास करण्यात आला. त्यात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अधिक आढळून आली आहेत. वेळास, अंजर्ले, गुहागर, वायगणी ही घरट्यांचे मुख्य स्थळे असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
अडीच लाख अंडी
समुद्री कासवांनी २०२२-२३ या वर्षात दोन लाख ५३ हजार ६५२ अंडे घातली. त्यातील एक लाख ६० हजार ७१६ अंड्यांतून पिले बाहेर आली. पिलांना यशस्वीरीत्या जन्म देण्याची टक्केवारी ६० आहे.
फेब्रुवारीत सर्वाधिक घरटी
कासव घरटी बनविण्यास नोव्हेबर- डिसेंबर महिन्यात सुरुवात करतात. एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. सर्वाधिक घरटी फेब्रुवारीत तयार होतात. त्याची टक्केवारी ४१.५ टक्के असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. साधारणतः रात्रीच्या वेळी मादी अंडी घालते. एका विणीच्या हंगामात एक ते तीन वेळा साधारणतः २० ते २८ दिवसांच्या अंतराने अंडी घातली जातात.
घरट्यांची संख्या
१,३८७ : २०२२-२३
२,५४८ : २०२३-२४