चिपळूण : मंगळवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटासह शहरातील पॉवर हाऊस येथे झालेल्या भीषण अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एस.टी. चालकासह दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमींवर उपचार सुरू आहेत.
अनिल गोपिनाथ भोसले (कोरेगाव-सातारा), उदय किरण आटपलकर (देगलूर-नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सुभाष रामचंद्र भुवड (चिपळूण पोलीस ठाणे), सौरभ सुनील नरळकर (पेढे) यांनी दिली.
मंगळवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास उदय आटपलकर व त्याचा मित्र साहिल असे दोघेजण दुचाकीने मुंबई-गोवा महामार्गाने सावर्डेकडून चिपळूणच्या दिशेने येत होते. ते कामथे घाटात आले असता त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी महामार्गाच्या लोखंडी गर्डरवर जोरदार आदळली. यात उदय व साहिल सुर्वे यांना गंभीर दुखापत झाल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी उदय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास दुचाकीने सौरभ सुनील नरळकर, सिध्देश काणेकर, शुभम सुनील काणेकर हे तिघेजण मुंबई-गोवा महामार्गावरुन कापसाळकडे जात होते. ते पॉवर हाऊस येथे आले असता अनिल भोसले चालक असलेल्या कोल्हापूर-रोहा या एस.टी. बसने त्या तिघांना धडक दिली. यात ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी एस.टी.चालक भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.