रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे कालकर कोंड येथे चिरेखाणीचा व्यवसाय करणारा पावस भुसारवाडा येथील खाणमालक आसिफ कासम सावकार (56) याला पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्याने १३ बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी रात्री उशिरा ही कारवाई केली.
या खाण मालकाने 13 बांग्लादेशी घुसखोरांना जुन 2024 पासुन 11 नोव्हेंबर पर्यंत ते बांग्लादेशी नागरिक असल्याचे माहिती असूनही आपल्या खाणीवर कामासाठी ठेवले होते. या घूसखोर कामगारांनी कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय तसेच भारत बांग्लादेश सिमेवरील मुलखी अधिकार्याचे लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश केला होता. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी या सर्व कामगारांना अटक केली होती. परंतू खाण मालक आसिफ सावकार हा मुंबईत उपचारांसाठी गेला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे स्वतः करत आहेत. या गुन्हयातील 13 बांग्लादेशी कामगार सध्या न्यायालयीन कस्टडीत विशेष कारागृह रत्नागिरी येथे आहेत.