पैसाफंड इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
संगमेश्वर / प्रतिनिधी :- व्यापारी पैसा फंड संस्था आणि शाळा खूप जुनी आहे. व्यापारी मंडळींनी पैसा पैसा जमा करुन दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. पैसा फंडची प्रगती अभिनंदनीय आहे.विद्यार्थ्यांनी मातृभाषे बरोबरच अन्य भाषांकडे लक्ष द्यायला हवं याबरोबरच आपल्याला शिक्षण पद्धतीतील येणाऱ्या बदलाचे स्वागत करायला हवे. त्याबरोबरच मुलांनी इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन खेडचे माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे यांनी संगमेश्वर येथे बोलताना केले.
व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन पर कार्यक्रमात खेडचे माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, एल. पी. इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष शशिकांत पाटणे, संतोष पाटणे अध्यक्ष एल. पी. इंग्रजी माध्यम स्कुल, एल. पी. इंग्लिश स्कुलचे प्राचार्य भगत, संतोष रहाटे, असुर्डेचे माजी सरपंच संजय शिंदे, जनार्दन शिरगावकर,ऍड. संकेत शिरगावकर दिनेश आंब्रे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बिपीन पाटणे पुढे म्हणाले की, आपण कोणासारखं व्हायचं आहे, यासाठी आधी स्वतःला ओळखायला शिका. अभ्यासाबरोबरच खेळाकडे देखील लक्ष द्यायला हवं .शाळेत शिकत असताना संस्कार महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना विविध कलांकडे अधिकाधिक लक्ष द्यावे असे आवाहन. बिपीन पाटणे यांनी केले. पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सादर केलेले कलाविष्कार हे सध्याच्या सामाजिक आणि जिवंत विषयावर आधारित असल्याने,ते आपल्याला अधिक भावल्याचेही पाटणे यांनी नमूद केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते बिपीन पाटणे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते शशिकांत पाटणे यांचा सन्मान करण्यात आला. सदस्य संदीप सुर्वे यांच्या हस्ते संतोष पाटणे यांचा सन्मान करण्यात आला.सदस्य रमेश झगडे यांच्या हस्ते प्राचार्य भगत यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर यांच्या हस्ते व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये व सचिव धनंजय शेट्ये यांचा सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
भारतीय संविधानची प्रत अध्यक्ष अनिल शेट्ये यांना देवून तसेच सचिव धनंजय शेट्ये यांना कायद्याची पुस्तकं भेट देवून त्यांचा ऍड.अमित शिरगावकर यांनी सन्मान केला.ऍड. अमित शिरगावकर यावेळी बोलताना म्हणाले की, आज माझ्या शाळेत बोलवून माझा सन्मान केला याचा आनंद अवर्णनीय आहे असे नमूद केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे आणि विनोद ढोर्लेकर यांनी केले.
शिक्षण पद्धतीत येणाऱ्या बदलांचे स्वागत करा : बिपिन पाटणे
