देवरूख : नजीकच्या पांगरी येथील पांगरीमळा येथील नदीवरील पादचारी पूल रहदारीस धोकादायक बनला असून, शेतकरीवर्गाला वाहतुकीस उपयुक्त असलेला हा पूल त्वरित दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
पांगरीमळा पूल ग्रामस्थांना विशेषतः शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. पुलाच्या बांधकामाचे काँक्रिट ढासळत असून, तो अत्यंत रहदारीस धोकादायक बनला आहे. या पुलावरून वाहतुकीला मज्जाव करण्यासंदर्भातील आदेश बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला दिले आहेत.
या पुलाच्या दुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी अपेक्षित असल्याचेही बांधकाम विभागाने कळवले आहे. हा निधी मंजूर होऊन पुलाची दुरुस्ती व्हावी व ग्रामस्थांची गैरसोय दुरुस्त व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे करण्यात येत असल्याचे सरपंच सुनील म्हादे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकर कामास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही केली आहे.
देवरूख : पांगरीमळा येथील पूल धोकादायक
