चिपळूण:-विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी सर्वसामान्यांकडून मिळणारे प्रेम कमी झालेले नाही. भेटायला येणार्या लोकांचा ओघ आजही जास्त आहे. आपला पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागलेला आहे.
सर्वसामान्यांकडून मिळणारे हे प्रेमच आयुष्याची पुण्याई आहे. या प्रेमाच्या ऋणात राहून मी सदैव तुमच्यासाठी कार्य करीत राहीन, असे आश्वासन देत पक्षाच्या माध्यमातून आणि वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्यांसाठी खूप काही करायचे आहे. तुमची साथ अशीच कायम राहू द्या, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी घातली.
पेढे कुंभारवाडी येथे आयोजित कृतज्ञता बैठकीत ते बोलत होते. पेढे गावासह मजरेकाशी आणि वालोपे येथील ग्रामस्थ विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होत्या. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने प्रशांत यादव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निसटता पराभव झाला असला, तरी आमच्या मनातील आमदार तुम्हीच अशा भावना ग्रामस्थांनी या बैठकीत व्यक्त करीत यापुढेही आम्ही प्रशांत यादव यांच्याच पाठिशी कायम राहू, असा निर्धारही यावेळी ग्रामस्थांनी केला.
यावेळी प्रशांत यादव म्हणाले, पराभव झाला असला तरीही नागरिक आग्रहाने प्रत्येक कार्यक्रमाला बोलवत आहेत. हा पराभव पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मतदारांच्याही जिव्हारी लागला आहे, हे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक ठिकाणी भेटीगाठीसाठी जाताना लक्षात येते. केवळ आमदार ही चार अक्षरे माझ्या नावापुढे नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांकडून मिळणारे हे प्रेम हीच आपली पुण्याई आहे, असे मानून पराभवाने खचून न जाता आपण आपले कार्य पुढे सुरूच ठेवायचे, असा निर्धार केला आहे. त्यामुळे सरकार असो नसो, चिंता करू नका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सजग राहा. भूलथापांना बळी पडू नका. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ द्यायचे आहे. त्याला उभा करायचा आहे. त्यादृष्टीने यापुढे काम करत राहू, असेही यावेळी प्रशांत यादव म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, माजी पं. स. सदस्या ऋतुजा पवार, माजी सरपंच मंगेश कोकीरकर, माजी सरपंच दीपक मोरे, संतोष चोपडे, सुहासिनी पडवेकर, अष्टविनायक टेरवकर, रघुनाथ माळी, शिवसेना (उबाठा) महिला तालुका संघटक मानसी भोसले, शाखाप्रमुख सुनील नरळकर, ज्येष्ठ शिवसैनिक दगडू पडवेकर, पेढे ग्रामपंचायतीच्या सदस्य सिद्धी संसारे, ज्येष्ठ शिवसैनिक नाना मोरे, नंदन कदम, ह.भ.प. महेश टेरवकर महाराज, ज्येष्ठ शिवसैनिक सखाराम पानकर, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते सूरज पडवेकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख आशिष सुर्वे यांसह वालोपे, पेढे आणि मजरेकाशी येथील ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.